
| पुस्तकाचे नाव: | चतुर | लेखक: | प्रणव सखदेव |
| प्रकाशन: | रोहन प्रकाशन | पृष्ठसंख्या: | 148 |
| मूल्यांकन: | 9/10 | किंमत: | ₹180.00 Order Now |
‘चतुर’ ही प्रणव सखदेव यांची कादंबरी वाचण्याआधी या तरुण लेखकांचं नाव ऐकून माहीत होतं. पण प्रामाणिकपणे कबूली द्यायची तर याआधी यांचं काही वाचलं नव्हतं, म्हणजे ठरवून वाचलं नाही असं नाही पण योग नव्हता आला वा आता पुस्तक वाचल्यानंतर ‘माझा करंटेपणा’ असं खात्रीशीर म्हणू शकतो.
अन्वर हुसेन यांनी केलेलं कादंबरीचं मुखपृष्ठ अप्रतिम आहे, कादंबरीबद्दल कुतूहल वाढवतंच पण कादंबरीकडे पाहण्याला एक दृष्टी देतं. चतुराची गुंतागुंत, स्वत:शी गुणगुणणं, त्याची रंगीत दिवास्वप्न, स्वप्निल अनुभव, वास्तव आणि स्वप्नाचा धूसर पडदा, शेपटीशी बांधलेला अदृश्य दोर, जणू मृत्यू या अंतिम वास्तवाचं भान आणि त्याला काडेपेटीच्या आतबाहेर अनुभवता येणारी पोकळी, हे सारं सारं फार मस्त रेखाटलं आहे. पुस्तक उघडल्यावर प्रस्तावनाही वेगळ्या धाटणीची, आणि त्याआधीही ‘ वाचकांनी या पुस्तकातील सर्व पात्रांचा संबंध लेखकाच्या जीवनाशी खोदून खोदून जोडून पहावा ‘ ही विनंतीवजा अचाट सूचना वाचून काहीतरी अफलातून वाचायला मिळणार याने मन मनोमन सुखावतं.
विनंती आणि प्रस्तावना यात फलंदाजासारखे खेळपट्टी आणि गोलंदाज यांचा अंदाज घेत पुरेसे सेट झाल्यानंतर सुरू होतो आपला प्रवास. प्रणव आणि रमा हे या प्रवासातले सोबती बनतात.
वाचता वाचता उलगडतं की प्रणवला काहीतरी दुर्धर आजार आहे आणि त्याची जीवनयात्रा लवकरच समाप्त होणार आहे. पण त्याआधी त्याला एक पुस्तक लिहायचं असतं, ज्याचे मसुदे त्याने लिहिलेले असतात पण हे लिखाण एकसंध नसतं त्याची सांगड घालावी लागते, त्याला जोड द्यावी लागते, त्याला एक सुरुवात मध्य आणि शेवट असा काहीतरी आकार द्यायचा असतो, ही जबाबदारी त्याची सहचारिणी रमा हिला पार पाडायची असते.
मग हे खर्डे वाचता वाचता आपल्याला प्रणव सुटा सुटा भेटतो, नदीच्या संगमासारखी प्रणवमध्ये एकजीव झालेली रमा काठावरून त्रयस्तासारखा हा प्रवास पाहते तेव्हा तिला या प्रवाहाची उगमापासूनची नानाविध रूपं दिसतात. ती तिच्या परीने या प्रवाहाचा अंदाज घेत, या प्रवाहात उतरते, तिच्या या पैलतीरी पोहोचण्याच्या प्रयत्नाचा लेखाजोखा या कादंबरीत फार सुंदर पद्धतीने मांडला आहे.
अजून एक प्रांजळ कबूली द्यायची तर, अब्सट्रेक्ट वगैरेच्या भानगडीत मी जात नाही, कारण ते कोणाला कितपत कळतं हे मला कळत नाही, पण मला अजिबात कळत नाही. पण चतुर वेगळं आहे. ते कळतं. भिडतं. भिनतं.
चतुर वाचणं हा एक अव्यक्त अनुभव आहे. ही एक तंद्री लागलेली मैफल आहे. संवेदनांना धरून केलेलं लिखाण असेल तर शब्दन् शब्द स्पंदन होतो हे यातल्या पानोपानी जाणवतं. हे पुस्तक आपल्या श्वासांची लय काबीज करून आपल्या मनोविश्वावर अलगद स्वार होतं. तुम्हीही हा अनोखा अनुभव चुकवू नका, हे पुस्तक नक्की वाचा.
– प्रसाद साळुंखे

