पुस्तकानुभवबद्दल थोडंसं ...
मला पुस्तकं वाचायला फार आवडतात. पुस्तकं मला टाईम मशिन सारखी वाटतात. आपलं विश्व क्षणभरासाठी विसरून दुसऱ्याच विश्वात नेण्याचं जादुई कसब पुस्तकात असतं. विरंगुळा म्हणून दोन चार पानं चाळण्याचा हा प्रवास बघता बघता माझ्याही नकळत कपाटं ओतप्रोत भरण्यापर्यंत कधी पोहोचला कळलंच नाही. एखादं भन्नाट पुस्तक वाचलं तर मित्र आप्तेष्टांना त्या पुस्तकाची किती कौतुकं सांगू असं होतं. हा आनंद इतरांना मिळावा इतकाच खरं तर सहज निर्मळ हेतू. मध्यंतरी यातून सामाजिक प्रसारमाध्यमांवर वाचलेल्या पुस्तकाबद्दल अनियमितपणे अघळपघळ स्वरूपात खरडणं झालं, ज्याला रसिक प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसादही दिला. पण त्यात पोस्ट अप्रोव होईल की नाही, किंवा वाटतं तसं आणि तितकं, हव्या त्या पुस्तकांवर मनमोकळं लिहिता येईल की नाही याबद्दल साशंक होतो. यावर तोडगा म्हणून वाचलेलं सारं एका ठिकाणी पाहता यावं म्हणून ‘ पुस्तकानुभव ‘ चा हा रीतसर घाट घातला. एखादं पुस्तक वाचण्याच्या काळात पुस्तकाबद्दल काय अनुभव आला हे मी यात प्रामाणिकपणे मांडलं आहे. माझ्यासारखी वाचनाची अभिरुची जपणाऱ्या रसिक मित्रांसोबत या पुस्तकांवर प्रतिक्रियांद्वारे चर्चा करून विविध पैलूंनी पुस्तक समजून घ्यायचा एक उत्साही प्रामाणिक प्रयत्न आहे.
पुस्तक वाचण्याचा प्रत्येकाचा एक प्रवास असतो. काहींनी केलेली सुरुवात थोडक्यात आटोपली जाते. तर काही संयम बाळगून, सातत्य राखत दीर्घकाळ या प्रवासाचा नानाविध पद्धतीच्या वाचनाने आनंद घेतात. या प्रवासात तुम्ही कुठल्याही टप्प्यावर असलात तरी मला तुमचा सहप्रवासी समजून थोडा काळ मी वाचलेल्या पानावरून टिपलेल्या अनुभवांचा आस्वाद तुम्हाला घेता यावा याचीसाठी हा अट्टाहास.
हे समीक्षण नाही, परीक्षण नाही, केवळ माझ्या चष्म्यातून केलेलं प्रामाणिक निरीक्षण आहे. चला तर प्रवासाला सुरुवात करुया. आपल्या सर्वांचा प्रवास सुखकर होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
—
प्रसाद साळुंखे