150+ Books Reviews    |    15000+ Visitors/Month    |    800+ Comments    |    4000+ Books Sold    |    150+ Books Reviews    |    15000+ Visitors/Month    |    800+ Comments    |    4000+ Books Sold    |   

अतरापी –  ध्रुव भट्ट  | Atrapi – Dhruv Bhatt | Marathi Book Review |  Pustakanubhav

Book Page Image
पुस्तकाचे नाव: अतरापी लेखक: ध्रुव भट्ट
प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठसंख्या: 146
मूल्यांकन:
9/10
किंमत: ₹120.00 Order Now

लिहितोस बरा. वाचतोसही थोडंफार (की फार थोडं?) पण त्या वाचनाला काही सातत्य नाही, की शिस्त नाही. अमूक एक विषय धरून अभ्यासूपणे वाचणं किंवा काहीही करणं तुझ्या स्वभावात नाही. अशा तक्रारवजा विनंत्या आणि त्यावर माझं दिलखुलास हसणं हा नेहमीचा अनुभव गाठीशी घेऊन, निदान वाचनात गांभीर्य नाही हे सत्य साफ खोटं भासवायला का होईना किमान आवडत्या लेखकांची पुस्तकं एकामागोमाग एक वाचू असं ठरवून हे पुस्तकं वाचायला घेतलं.

‘तत्वमसि’ वाचल्यानंतर ध्रुव भट्ट या नावाकडून वेगळ्या अपेक्षा होत्याच. आणि त्या अपेक्षांवर ‘अतरापी ‘ खरं उतरलं. वरकरणी बघायला गेलं तर ही दोन कुत्र्यांची कथा आहे. म्हणजे दोन श्वानबंधूंची. ‘ सदभाविनी ‘ या जातिवंत आणि अतिशय प्रेमळ कुत्रीच्या पोटी जन्मलेली ही दोन पिलं ‘ कौलेयक ‘ हा मोठा आणि ‘ सारमेय ‘ हे शेंडेफळ. दोघांचे स्वभावही निराळे आणि जगण्याच्या पद्धतीही. ‘ कौलेयक ‘ पूर्णपणे संयमी, आज्ञाधारी, निती नियम पाळणारा, अभ्यासू, समंजस असा आदर्श श्वान. तर ‘ सारमेय ‘ स्वच्छंदी, भावनाप्रधान, स्वतःच्या अटींवर जगणारा, बंधनं झुगारणारा , कसलंही दडपण न घेता प्रश्न विचारणारा, निसर्गाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करणारा, आपल्या अंतर्मनाचंच ऐकणारा असा अवलिया. कादंबरीत श्वानांची केवळ ही रूपकं आहेत, एकंदरीत मानवी जगण्यावरच फार सुंदर भाष्य हे पुस्तक करतं.

अशा या दोन भावांचा जगण्यापासून मृत्यूपर्यंतचा किंवा काही प्रमाणात त्याही पुढचा हा प्रवास या कादंबरीत आहे. एकाच आईच्या पोटी जन्मूनही दोन भिन्न विचारप्रवाह घेऊन हे दोघे बंधू जगतात. यातला मोठा भाऊ ‘ कौलेयक ‘ ऐकीव अध्यात्म, तत्वज्ञानाचे टेकू देऊन जगण्याला अर्थ देऊ पाहतो. तर धाकटा ‘ सारमेय ‘ लहानपणीच घर त्यागून जगण्याची नवी वाट शोधू पाहतो. या ‘ सारमेय ‘ ला पुस्तकी घोकंपट्टी येत नसली आयुष्याशी समरसून जगणं सारं काही शिकवतं. अर्थात हे सगळं सिद्ध करायला पुरावा म्हणून ‘ सारमेय ‘ कडे त्याच्या चातुर्यापलीकडे काही पुरावे, पदं, त्याला मानणारे अनुयायी वगैरे नसतात. पण काही चोखंदळ माणसांना तो कौलेयकापेक्षा उजवा आहे याची प्रचिती वारंवार येते.

आयुष्याच्या एका टप्प्यावर कौलेयकाचे गुरुजी कौलेयकाला दुनियेकडून काहीतरी शिकण्यासाठी म्हणून भटकंतीसाठी प्रवृत्त करतात. पण कौलेयकाचे पूर्वदूषितग्रह त्याला फार काळ भटकं आयुष्य जगण्यास अडथळे निर्माण करतात. तो पुन्हा आश्रम स्थापून पोकळ उपदेश देण्याचा सोपा मार्ग अवलंबतो.

या उलट ‘ सारमेय ‘ लहानपणापासून स्वतःच्या मर्जीने आणि स्वतःच्या अटींवर निरनिराळ्या ठिकाणी राहतो. वेगवेगळी माणसं अनुभवतो, आणि चार भिंतींच्या कुठल्याही शाळेत शिकता येणार नाही असं त्याला जगण्याची, निसर्गाची शाळा शिकवते.

एक प्रसंग असा येतो की कौलेयकाचे गुरुजी सारमेयला शिक्षक बनण्याविषयी सुचवतात, ज्याचा अर्थात कौलेयकाला अचंबा वाटल्याखेरीज राहत नाही. पण सारमेयाच्या विचारात स्पष्टता असते, त्याला कसल्या बंधनात अडकून रहायचंच नसतं मूळी म्हणून तो हा प्रस्ताव नम्रपणे नाकारतो. बंधनमुक्ती हे ध्येयच असतं जणू, नाही ध्येय नाही स्वभावाची छटा कारण ध्येय म्हटलं तरी ध्येयाप्रति बांधिलकी आलीच.

कौलेयकाचा प्रवास हा वरकरणी आदर्श वाटत असला तरी तो आतून बाहेर असा होतो. म्हणजे पुस्तकी वा ऐकीव ज्ञान आत साठवायचं, आणि ठराविक काळानंतर उपदेश स्वरूपात त्याचा उत्सर्ग आतून बाहेर करायचा. म्हणजे आयुष्यभर ज्ञान ज्ञान म्हणत माहितीचं उथळ डबकं ज्ञानगंगा म्हणून मिरवायचं. लोकांचा ‘ज्ञानी’ हा आपल्या बद्दलचा गैरसमज अंतिम सत्य म्हणून सिद्ध करण्यासाठी आयुष्यभर केविलवाणं धडपडायचं इतकंच काय ते ध्येय.

याउलट सारमेयाचा प्रवास बाहेरून आत, थेट आयुष्याच्या गाभ्यापर्यंतचा. त्याचं भटकणं म्हणजेच तुकड्या तुकड्यात स्वतःलाच शोधणं. आयुष्याकडून वेळोवेळी काहीतरी नवं शिकणं, स्वतःमध्ये काहीतरी नवं शोधणं. आयुष्याचं डबकं न बनवता आयुष्य निखळ निर्मळ प्रवाही बनवणं. सारमेयाच्या जगण्याला त्याचा प्रवास नवनवे पैलू पाडत असतो. म्हणून सारमेयाच्या विलक्षण तेजासमोर सारे स्वघोषित ज्ञानसूर्य क्षीण, निस्तेज वाटतात. शेवटी आपल्या आतला स्वतःचा निसर्गदत्त आवाज ऐकून मनाप्रमाणे जगणं हा देखील व्यक्तिमत्त्व विकासच की, भले मग तो पैसा, प्रसिध्दी वैगेरे यशाच्या परिमाणांवर खरा उतरो किंवा न उतरो. शेवटी यशाची व्याख्याही श्वानसापेक्षच.

यात एक प्रसंग असा आहे की गुरुजींची आठवण म्हणून कौलेयकाला त्यांचं लहानपणीचं वस्त्र आणि कौलेयकाच्या मालकाला गुरुजींची चांदीची डबी मिळते. त्यावर शांत स्वभावाच्या मालकीणबाई अनपेक्षितपणे सुनवतात की ‘ ज्यांना गुरुजी गवसत नाहीत, त्यांना गुरुजींच्या झबल्या- डब्यांवरच समाधान मानावं लागतं ‘ हे वाक्य आणि अशी कित्येक वाक्य या कादंबरीत मस्त पेरली आहेत. त्यामुळे वाचतांना औस्तुक्य निरंतर कायम राहतं, त्यातही सारमेया बद्दल वाचतांना अधिक गुंतायला होतं.

एकाच वेळी दोन समांतर आयुष्य दाखवायचं कौशल्य लेखकाने फार सुंदर पद्धतीने साधलं आहे. लेखन सुटसुटीत आहे, कादंबरी कुठल्याही निष्कर्षावर पोहीचायची घाई करत नाही, काही अधोरेखित करत नाही, व हातचं राखून सांगते असंही नाही. पण तरी लेखकाला या प्रवासातून काय सांगायचं आहे ते अगदी नेमकेपणानं आपल्यापर्यंत पोहोचतं.

सुरुवातीला दोन भावंडांबद्दल वाचतांना डावं उजवं करणं कठीण जातं. नंतर त्यांचा जीवनप्रवास जसा जसा पुढे सरकत जातो तसतसं तुलना करणंच मूर्खपणाचं वाटू लागतं. मनसोक्त निरपेक्ष जगण्याची तुलना कोणाशी काय करायची.

मुख्य म्हणजे सारमेय ‘under dog’ दाखवला नाहीये, त्याला ‘dog’ च ठेवलाय हे बरं. सारमेयाला कौलेयकाबद्दल विशेष अढी आहे असंही नाही दाखवलंय. कौलेयक मात्र लहान भावाबद्दल भटक्या, अज्ञानी वगैरे बोलतांना सर्रास दाखवला आहे. म्हणजे इतकं अध्यात्म, तत्वज्ञान वाचून, घोकून अंतरीच्या विकारांवर कौलेयक विजय मिळवू शकत नाही. तर दुसरीकडे निरपेक्ष भटकंती करूनही प्रतिकूल परिस्थितीचा लहानपणापासून सामना करूनही सारमेयाला निंदानालस्ती, राग, लोभ असे विकार जडत नाहीत. मग प्रश्न उरतो यातला खरा जातिवंत श्वान कोण?

पुस्तक वाचत असतांना वारंवार संदीप खरेंची ‘ मी हजार चितांनी ‘ ही कविता सारखी डोकावत राहते. खास करून शेवटचं कडवं –

‘ मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार

लपतो न परि चेहरा आता भेसूर

तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही

त्या श्यामनिळ्याच्या मोरपिसापरी दिसतो

मी हजार चितांनी हे डोके खाजवतो

तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो ‘

आता पुस्तक वाचून असे बरेच संभ्रम दूर झालेत, आयुष्याकडे पाहण्याची जणू नवी दृष्टी गवसली आहे. आता मनाचं मनोगत एकवार लक्षपूर्वक ऐकायचं ठरवलं आहे. तुम्हालाही हे पुस्तक वाचावं असं मनापासून वाटतं असेल तर नक्की वाचा.

SHARE THIS :

Related Books (तुमच्यासाठी सुचवलेले) -

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top