150+ Books Reviews    |    15000+ Visitors/Month    |    800+ Comments    |    4000+ Books Sold    |    150+ Books Reviews    |    15000+ Visitors/Month    |    800+ Comments    |    4000+ Books Sold    |   

लस्ट फॉर लालबाग –  विश्वास पाटील  |   Lust for Lalbagh – Vishwas Patil  | Marathi Book Review |  Pustakanubhav

Book Page Image
पुस्तकाचे नाव: लस्ट फॉर लालबाग लेखक:  विश्वास पाटील 
प्रकाशन: राजहंस प्रकाशन पृष्ठसंख्या: 804
मूल्यांकन:
9/10
किंमत: ₹600.00 Order Now

‘लस्ट फॉर लालबाग’ नावाचं पुस्तक काही महिन्यांपूर्वी वाचलं. लालबाग परेल भागात मी आधी केवळ गणपती समारंभात मौज म्हणून,छायाचित्रणाचा नाद म्हणून आणि हल्ली कामानिमित्त फिरलोय. या शहरातल्या काही जागा म्हणजे जिवंत थडगी आहेत, असं जाणवतं. इथल्या मॉल्समध्ये मन रमत नाही. इथल्या टोलेजंग टॉवर्स आणि स्कायस्केपर्सच्या भिंतीत असंख्य संसार चिणून पुरलेत असं वाटतं. ते सुतकी डोळे , खपाटीला गेलेली पोटं, भांडवलंदारांपुढे पिचलेल्या दुबळ्या कामगारांचे ओठातच विरून गेलेले आक्रोश मला सुन्न करतात. मी इथलाच या मातीतलाच. त्यामुळे अतिपरिचयात अवज्ञा असेल. पण नव्या पिढीतल्या कोणाला इथल्या मॉल्समधून , रेस्तराँट मधून खळखळून हसून बाहेर पडताना पाहतो तेव्हा भडभडून येतं. या भागाचे राजे म्हणून मिरवलेल्यांची पुढची पिढी थंड नजरेने लादी पुसतांना दिसते तेव्हा त्या वातानुकूलित थंड वातावरणात डोक्याचा भडका उडेल असं वाटतं. या शहराने रंकाचे राव होतांना पाहिलेत तसेच रावांचे रंक होतानाही पाहिलेत. चित्रपट, नाटक गिरणी संप या प्रश्नाला हवा तसा न्याय देऊ शकले नाहीत असं माझं वैयक्तिक मत आहे. या विषयावर काहीतरी सकस वाचायला मिळावं याच्या शोधात मी होतो आणि तेव्हाच ‘लस्ट फॉर लालबाग’ हे पुस्तक हाती पडलं. ‘विश्वास पाटील’ नाव वाचल्यावर पुस्तकाच्या दर्जाबद्दल शंका घेण्यास वाव नव्हता. या पुस्तकात एक काल्पनिक कथा आहे पण पार्श्वभूमी वास्तववादी ,घाम रक्त आणि अक्रोशाने लडबडलेल्या गिरणगावाची आहे. सन मिल, मफतलाल, फिनिक्स, दिपक सिनेमा, भारतमाता सारी ठिकाणं आपण पाहिलेली पण काळ १९८२ चा. कथानक बेमालूम वास्तवात गुंफलं आहे. बऱ्याच गोष्टींचा पुनर्विचार करण्यास हे पुस्तक भाग पाडतं. जसं की दत्ता सामंतांचं नेतृत्व खरंच इतकं पोकळ होतं का? बडेबडे भांडवलदार खरेच धुतल्या तांदळासारखे आहेत का? लोकशाही हे भांडवलदारांच्या हातचं बाहुलं आहे का? अडीज लाख संसार पत्त्यांच्या कागदी बंगल्यासारखे मोडकळीस आणणं या देशात शक्य आहे? न्यायदेवता आंधळी ठीक पण मिडिया तेव्हाही लोचटच होती का? शिवसेनेसारखे पक्ष मराठीच्या कार्डवर फोफावतात, त्यांच्या सिंहगर्जना संपाच्या काळात आवंढा गिळल्यासारख्या दबून का गेल्या? लिजच्या जागा सरकारी की भांडवलदारांना हुंड्यात मिळालेल्या ज्या वाढीव एफ एस आयच्या एक दोन नव्हे तर तब्बल पंधरा हजार करोडच्या व्यवहारांना भुलून बिनदिक्कत विकता येतात? मराठी माणूस या शहरातून हद्दपार करायला सुरुवात कोणी केली? मुळात एक सामान्य माणूस म्हणून आपली या व्यवस्थेत काय किंमत आहे? एवढा इतिहास घडूनही सारं या शहराने स्वीकारलं, मॉल आणि टॉवर संस्कृतीचा नवा चेहराही. या शहरानेच असं नाही तर ज्यांना पाण्यात बुडवून ठेवलं, ज्यांचे उंबरे झिजवले ते सिद्धिविनायक, महालक्ष्मी, हाजीआली, आणि लालबाग, गणेशगल्लीतले राजेही हतबल होऊन फक्त पहात राहिले कोसळलेले संसार, आणि महत्वाकांक्षा, आणि स्वार्थाच्या, न शमणाऱ्या पैशाच्या बकसुरी भुकेच्या, उंचचउंच गगनचुंबी इमारती.

SHARE THIS :

Related Books (तुमच्यासाठी सुचवलेले) -

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top