
| पुस्तकाचे नाव: | साक्षी | लेखक: | डॉ. एस. एल. भैरप्पा |
| प्रकाशन: | मेहता पब्लिशिंग हाऊस | पृष्ठसंख्या: | 319 |
| मूल्यांकन: | 9/10 | किंमत: | ₹322.00 Order Now |
डॉ. एस. एल. भैरप्पा यांची ‘ साक्षी ‘ नावाची उमा कुलकर्णींनी मराठीत अनुवादीत केलेली अप्रतिम कादंबरी नुकतीच वाचली. अपेक्षेप्रमाणे वेगळ्या धाटणीची हटके विषयाची कादंबरी आहे ही.
या कादंबरीची हटके सुरुवात होते तीच मूळात यमलोकापासून. जिथे ‘परमेश्वरय्या’ नावाच्या तत्वनिष्ठ गृहस्थाचा पुण्यात्मा आलेला असतो. आत्महत्येमुळे त्यांना इथे यावं लागलं असतं. आत्महत्याही केलेली असते ती केवळ स्वतःच्या मनाविरुद्ध कोर्टात खोटी साक्ष दिल्यामुळे. खरं तर विषय इथे संपायला हवा होता, माणूस गेला गोष्ट संपली असं सामान्यपणे आपल्या सर्वांना वाटू शकतं. पण खरी गोष्ट सुरू होते ती इथूनच.
त्यांच्या आत्महत्येच्या कारणांवर विचारविनिमय केला जातो. त्यांच्या जगण्यावर न्यायनिवाडा होतो. ईश्वर आणि चित्रगुप्त मग त्याला संधी देतात त्याला माहीत असलेल्या सत्या पलीकडच्या प्रदेशात विहार करण्याची, अट फक्त एकच तो फक्त एक मूक साक्षीदार म्हणून जगात प्रवेश करेल, त्याला कोणत्याची घटनांमध्ये कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करता येणार नाही.
या नंतर कथा पुढे सरकू लागते, आधी परमेश्वरय्यांच्या नजरेतून पाहिलेली पात्र, कुठलाही आडपडदा न ठेवता आपल्यासमोर उलगडू लागतात. सत्याचे निरनिराळे पदर उलगडू लागतात, त्याचवेळेस असत्य उंची वस्त्र लेवून लपण्याचा आटोकाट प्रयत्न करतं. शेवटी शेवटी सत्य असत्याचे भेदही धूसर होत जातात.
या कथाबीजामध्ये फार शक्यता सामावलेल्या आहेत. एक अदृश्य गूढ आहेच, उत्सुकताही आहे की पुढे काय घडेल. कित्येकदा वाचलेला प्रसंग हेच अंतिम सत्य आहे का असा संभ्रमही मनात निर्माण होतो. माणूस राग, लोभ, मद, मत्सर याने किती वेढलेला आहे हेही पदोपदी जाणवतं. कुठल्या कुटुंबातील कुठली व्यक्ती कशी निपजेल हे सांगता येत नाही, कच्चा माल उत्तम असेल तर अंतिम वस्तूही चांगली तयार होईल असं सरळसोट गणित नव्हे. परिस्थिती, स्वभावधर्म, मनावर ताबा, भावनांवर नियंत्रण, हाताशी असलेला पैसा, जपलेली जीवनमूल्ये या साऱ्याचा अर्क म्हणजे एखाद्याचा स्वभावधर्म असतो. तोल ढळण्याचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण नंतर तोल सावरला कसा जातो यावर त्या आयुष्याचं प्राक्तन ठरतं. शेवटी प्राक्तन म्हणजे बहुतेकदा घेतलेल्या निर्णयाचे परिणामच असतात. एक चुकीचा निर्णय बरोबर ठरवायला अनेक चुकीचे निर्णय घेतले जातात, शेवटी शेवटी असत्याचा अंतिम सत्य असा समज करून घेतला जातो.
कादंबरीची गंमत म्हणजे परमेश्वरय्या एकटेच मूक साक्षीदार नसतात, वाचक म्हणून आपणही या साऱ्या प्रसंगांचे मूक साक्षीदारच असतो. केवळ बघे, हस्तक्षेप करू न शकणारे, कारण तेव्हा वेळ टळलेली असते. म्हणून आपल्याला आपल्या आयुष्याचा थोड्या अंशी पुनर्विचार करायला ही कादंबरी भाग पाडते, थोडसं समोरच्याच्या चष्म्यातून जग पहायला ही कादंबरी शिकवते.
लेखकाची शैली अनोखी आहे. खूप तोलून मापून सांभाळून लिहिलं आहे, असं वाटतं कादंबरी लिहितांना साक्षीदार ही भूमिका डोक्यात ठेवूनच लिहिलं आहे. कुठेही बोजड तत्वज्ञान नाही, कुठेही कोणाला नावं ठेवणं नाही वा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं नाही. एवढंच काय ईश्वर आणि चित्रगुप्तही काही लंबीचौडी आदर्शवादी स्वगतं आळवतांना दिसत नाहीत. तरीही आदर्श जीवनाची एक सुंदर प्रतिमा निर्माण करायला लेखक यशस्वी होतो, कदाचित हेच या कादंबरीचं यश असेल.
उमा कुलकर्णी यांनी देखील अनुवाद फार सुंदर केला आहे. कुठेही वाचताना नावं सवयीची नसली तरी एखादं अनुवादीत पुस्तक वाचतोय असं वाटत नाही. या कादंबरीत ग्रामीण जीवन, तिथल्या घरांची, बागांची, शेतमळ्यांची वर्णनं, समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांच्या निरनिराळ्या भाषा हे सांस्कृतिक बदल अनुवादातही चपखल आले आहेत, त्यामुळे वाचतांना आपल्याला एक ताल, एक एकसंधपणा जाणवतो, कुठेही भलत्याच अनोळखी प्रदेशात भटकंती करतो आहोत असं वाटत नाही.
मला वाटतं चोखंदळ रसिकांनी अशा अनोख्या आशयाची कादंबरी वाचणं चुकवू नये.

