
| पुस्तकाचे नाव: | घनगर्द | लेखक: | हृषीकेश गुप्ते |
| प्रकाशन: | रोहन प्रकाशन | पृष्ठसंख्या: | 236 |
| मूल्यांकन: | 10/10 | किंमत: | ₹255.00 Order Now |
मॉलमध्ये फिरता फिरता मराठी पुस्तकांच्या विरळ गर्दीत ‘घनगर्द’ हे पुस्तक दिसलं. मुखपृष्ठ बघूनच पुस्तकाबद्दल कुतूहल वाटलं, तरी लेखकाचं नाव पाहिलं, हृषीकेश गुप्ते, मग मॉलच्या पुस्तकांच्या विशेषकरून मराठी पुस्तकांच्या अभिरुचीबद्दल मनात काही शंका उरली नाही.
पुस्तकाला निखिलेश चित्रेंनी लिहिलेल्या प्रस्तावनेमुळे पुस्तक वाचायची उत्सुकता अधिक ताणली गेली, आणि विशेष म्हणजे ती उत्सुकता रास्त होती, कारण पुस्तक वाचल्यानंतर कुठलाही भ्रमनिरास झाला नाही. हृषीकेश गुप्तेंची शैलीच तशी खास आहे. त्यांची कथा वाचणं हा एक वेगळाच अनुभव आहे. कथा आपली पकड अगदी सुरुवातीपासून घेते. भयाचाही आपण मनमुराद उपभोग घेऊ लागतो. बरं भय दाखवायला नेहमी एखादी चेटकीण, वा सैतान वा आत्मा वगैरे दाखवावा लागतो असंही नाही, भय नेहमीच्या जगण्यातही गुंफता येतं. मग ते तुमच्या भूतकाळाबद्दल, भविष्याबद्दल, आजूबाजूच्या माणसांबद्दल असेल, वा निसर्गाच्या विसंगत वागण्यात असेल. भयकथांमध्ये सुरुवातीपासून छोटे छोटे भितीचे संकेत पेरण्याची ही शैली फारच प्रभावित करते, त्यामुळे कथेवर पकड ठेवली जातेच शिवाय कथा एक मस्त वेग पकडते, कुठेही अकारण रेंगाळली आहे कथा असं वाटत नाही. कथेत रमण्याचं महत्वाचं कारण म्हणजे लेखकाने केलेली वर्णनं वास, चव, इथवर मर्यादित न राहता अगदी पात्राच्या शरीरात, मनात, मेंदूत त्यावेळी काय चाललं असेल याची फार प्रभावी वर्णनं लेखक करतो, ज्याने आपल्याला सिनेमा पाहिल्यासारखं सारं चित्र साकारायला मदत होते.
या कथासंग्रहात हृषीकेश गुप्तेंच्या विविध दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या पाच कथा आहेत, प्रत्येक कथेची धाटणी वेगळी आहे. मला कथेचा पूर्ण उपभोग घेता यावा म्हणून मी एका दिवसाला एकच कथा वाचली, भराभर चाळून काढावं मुद्दामहून वाटलं नाही, कदाचित ते इतर कथांना अन्यायकारक होईल असं वाटलं. एकेक करून सर्व कथांचा मला पुरेपूर आस्वाद घ्यायचा होता, त्या कथानकात रेंगाळायचं होतं.
‘घनगर्द ‘ नावाची पहिलीच कथा एका पौगंडावस्थेतील मुलीच्या मनातील द्वंद्व मांडते, या कथेत लेखकाने वेगवेगळे प्रयोग केले आहे. म्हणजे कथेचं भूतकाळात आणि वर्तमानात लपंडाव खेळणं असो, की साऱ्या पात्रांच रिमोटचं बटण दाबल्याप्रमाणे स्लो मोशन होण्याची कल्पना असो सारं वाचतांना फार अफलातून वाटतं. ‘पावसात आला कोणी’ ही रायटर्स ब्लॉक वर काल्पनिक भाष्य करणारी कथाही अशीच वेगळी. ‘ पानगळ ‘ कथे मध्ये एक लहानपणीची खोडी कसं आयुष्य ढवळून काढू शकते याचं वर्णन आहे. ‘ मुआवजा ‘ कथा प्रत्येक गोष्टीला ‘ मुआवजा ‘ असतो हे मनावर बिंबवते, नायका बरोबर आपणही तो ‘ मुआवजा ‘ जाणून घ्यायला अस्वस्थ होतो. पाचवी कथा ‘रमलवाटा’ ही आपल्याला एका वेगळ्याच प्रदेशाची सफर घडवून आणते. साऱ्या कथा मस्त गुंफल्या आहेत. मला वैयक्तिक आवडलेल्या कथा म्हणजे ‘घनगर्द’ आणि ‘ पानगळ ‘, अर्थात साऱ्याच कथा दर्जेदार आहेत. तुम्हाला भयकथा, गूढकथा आवडत असतील अथवा वेगळ्या धाटणीचं काही वाचायचं असेल, तर हा कथासंग्रह तुम्ही नक्की वाचू शकता. असं आहे की भयात रंजकता वाटू लागली की आयुष्याची आव्हानं थोडी सोपी वाटतात.

