
| पुस्तकाचे नाव: | वॉर्ड नंबर पाच, केईएम | लेखक: | रवी बापट |
| प्रकाशन: | रोहन क्वीन | पृष्ठसंख्या: | 301 |
| मूल्यांकन: | 10/10 | किंमत: | ₹400.00 Order Now |
डॉक्टरांचे विनोद बरेच पाहिलेत, ऐकलेत. या आरोग्यक्षेत्रातल्या भ्रष्टाचारावर पण केलेल्या चर्चा ऐकल्या आहेत. पण तरीही आपल्या प्रत्येकाच्या संपर्कात अपवाद म्हणून एक चांगला डॉक्टर असतोच, जो आपल्याला काहीतरी आशादायी चित्र दाखवत असतो. अशा चांगल्या डॉक्टरबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल, आव्हानांवर वाचायला मिळालं तर ?, त्यातूनही डॉक्टर जर केईएम् सारख्या सार्वजनिक रुग्णालयात काम करणारा असेल तर अगदी सर्व स्तरातल्या रुग्णांचे अस्सल अनुभव वाचायला मिळतील नाही? ही संधी आपल्याला डॉक्टर रवी बापट यांच्या या पुस्तकातून मिळते.
डॉक्टर रवी बापट यांना केईएम मध्ये त्यांच्या कार्यकाळात आलेले अनुभव त्यांनी या पुस्तकात जिवंत केले आहेत. विद्यार्थी, निवासी डॉक्टर, व्याख्याता, विभाग प्रमुख या साऱ्या भूमिका ज्या वास्तूने अनुभवल्या ती वास्तू म्हणजे केईएम. सार्वजनिक इस्पितळ म्हटलं की विविध स्तरातले लोक येतात मग ते राजकारणी असोत, गुन्हेगार असोत, खेळाडू, पत्रकार, कलाकार, गायक, गीतकार, कवी, लेखक किंवा सामान्य माणूस या साऱ्या रुग्णांवर त्यांच्या रोगाला सामोरे जाण्याच्या पद्धतीवर हे पुस्तक भाष्य करते. पेशंटला पुस्तकी ज्ञानाच्या आधारावर केवळ शास्त्रीय दृष्टीने न पाहता, त्याच्याशी संवाद साधून त्याच्या सामाजिक, भौगोलिक, आणि भावनिक भावविश्वाचा भाग बनून त्याच्यावर उपचार करणं हे डॉ. बापट यांना फार चांगलं जमतं म्हणूनच ते त्यांच्या रुग्णांचा विश्वास फार लवकर संपादन करतात, आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या कृतीने आणि प्रामाणिकपणाने तो अबाधित राखतात.
या त्यांच्या कार्यकालात सरकारी यंत्रणेत असूनही त्यांनी आपली तत्व आणि प्रामाणिकपणा यांच्याशी कधी तडजोड केली नाही. वा रुग्णांना उपकृत करतो आहोत अशा अभिर्भावात रुग्णांची सेवा केली नाही. तसेच सार्वजनिक इस्पितळ आहे म्हणून चलता है थाटात गोरगरीब रुग्णांवर प्रयोग म्हणून उपचार केले नाहीत.
एवढंच नाही डॉक्टरांच्या पिढ्यानपिढ्या पाहण्याचं भाग्य या वास्तूला मिळालं. आणि डॉक्टर रवी बापट यांच्या मुलाने डॉक्टर मिहिर बापट यांनीही हा वारसा यशस्वीपणे चालवला.
डॉक्टरांचा प्रत्येक क्षेत्रातील लोकांबरोबरचा सहज वावर आपल्याला अचंबित करतो. त्यांच्यातला पूर्वाश्रमीचा खेळाडू ते जिवंत ठेवतात, म्हणून खिलाडू वृत्तीने प्रत्येक प्रसंगात ते आपलं मन जिंकून घेतात.
डॉक्टर बनायला माणसाने संवेदनाशून्य असायलाच हवं असं नाही, संवेदना जागृत ठेवूनही लोकांना चांगले उपचार देता येतात हे डॉक्टरांनी सांगितलं आहे. स्वतःची व्यसनं, आजारपणं यावरही ते हातचं न राखता लिहितात. त्यामुळे पुस्तक गूळमट होत नाही. डॉक्टर म्हणून आयुष्यभर जपलेला प्रामाणिकपणा त्यांच्यातल्या लेखकानेही त्यांनी आवर्जून जपला आहे.
खरंतर डॉक्टर आणि रुग्ण हे नातं केवळ व्यवहारी असू नये. पण बरेचदा कोरडा व्यवहार दिसून येतो. मग डॉक्टर रवी बापटांसारखे काही अपवाद असतात जे पेशंटच्या संवेदना समजतात, अशा डॉक्टरशी पेशंटचं आपुलकीचं नातं निर्माण नाही झालं तर नवलच. पेशंटस देखील अशा डॉक्टरर्सच्या जणू कुटुंबाचा भागच बनून जातात. हा गोतावळा जमवणं आणि ही नाती पिढ्यानपिढ्या सांभाळणं हे वाचायला सोपं असलं आणि डॉक्टरांना सहजसाध्य झालं असेल तरी त्यामागे डॉक्टरांची मेहनत, त्यांची तळमळ, आपुलकी नक्कीच आहे आणि त्या मायेचं स्पंदन पानोपानी जाणवतं.
ॲप्रन आतल्या सेवाभावी माणसाबद्दल वाचायची दुर्मिळ संधी आपल्याला या पुस्तकामुळे मिळते, ही संधी रसिक चुकवणार नाहीत याची मला खात्री आहे.
– प्रसाद साळुंखे
आपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे 🙏🙏🙏


3 thoughts on “वॉर्ड नंबर पाच, केईएम”
Thanks
Test
ok